(मुंबई)
राज्य सरकारने आपल्या १२ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे सध्याचा ५३ टक्के महागाई भत्ता आता ५५ टक्क्यांवर जाणार आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी सुमारे १,७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून, राज्य सरकारच्या वित्त विभागाने सोमवारी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) जाहीर केला आहे.
राज्य सरकारचे धोरण केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्त्याचा लाभ देण्याचे आहे. याच धोरणानुसार, १ जानेवारी २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने वाढीव दोन टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. यामुळे १ जानेवारी २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील थकीत भत्ता आणि ऑगस्ट २०२५ महिन्याचा वाढीव भत्ता एकत्रितपणे रोख स्वरूपात कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे १२ लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांसह निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. यामध्ये शासकीय सेवेत कार्यरत सुमारे पाच लाख कर्मचारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे.
दरम्यान, येत्या २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत असल्यामुळे राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्याचे वेतन गणपतीपूर्वी देण्याची शक्यता आहे. वित्त विभागाकडून यासाठी आवश्यक ते प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी वित्त मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी शासकीय व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”, “संजय गांधी निराधार योजना” आणि इतर विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रलंबित तसेच चालू हप्ते गणेश चतुर्थीच्या आधी अदा करण्याचे आवाहन केले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून, गणेशोत्सवाच्या तोंडावर हा निर्णय त्यांच्या आर्थिक नियोजनात मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. वाढीव भत्त्यामुळे महागाईच्या वाढत्या झळा काही अंशी कमी होणार असून, सरकारकडून मिळणाऱ्या वेळेत वेतनामुळे सणाच्या खरेदीसाठीचा खर्च सुकर होईल, अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे.

