(रायगड)
कर्जत तालुक्यातील मौजे टेंभरे-आंबीवली येथील रिवाईल्ड सॅच्यूरी अँड चॅरिटेबल ट्रस्टमधून विदेशी पक्ष्यांची चोरी प्रकरण पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना गजाआड केले आहे. या कारवाईत एकूण ११.२५ लाख रुपयांमूल्याचे जिवंत पक्षी हस्तगत करण्यात आले आहेत.
घटनेचा तपशील
१७ जुलै २०२५ रोजी अज्ञात चोरट्यांनी ट्रस्टच्या लोखंडी पिंजऱ्याची कडी तोडून सात आफ्रिकन ग्रे पॅरोट, एक ब्ल्यू गोल्ड मकाव आणि एक स्कार्लेट मकाव चोरी केले. आफ्रिकन ग्रे पॅरोट प्रत्येकी ७५,००० रुपये किमतीचे असून ४० वर्षांपर्यंत जगतात. ब्ल्यू गोल्ड मकाव २ लाख आणि स्कार्लेट मकाव ४ लाख रुपये किमतीचे असून ६०-७० वर्षे जगतात आणि बोलण्याची क्षमता असते.
तपास व अटक
सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे पोलिसांनी आसपासच्या मार्गावरील कॅमेरे तपासून झिरोइंग पद्धतीने आरोपींची छायाचित्रे मिळवली. गुप्त माहितीदारांच्या मदतीने पहिला आरोपी अनिल रामचंद्र जाधव (रा. वावंढळ, खालापूर) याला अटक करण्यात आली. दुसरा आरोपी राजेशसिंग माहि उर्फ समशेरसिंग (रा. महिपालपूर, दिल्ली) चेन्नई, तामिळनाडूमधून पकडण्यात आला. त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व पक्षी व ११.२५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेला.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, कर्जत उप विभागीय पोलीस अधिकारी राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप भोसले व त्यांच्या टीमने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

