(फुणगुस / साजिद अ. खान)
गाव म्हटलं की मन कुठेतरी हरवून जातं… आणि जर पावसाळा सुरू असेल, तर हे मन तरंगतच भूतकाळात जातं, आठवणींचा एक महापूर मनात वाहू लागतो. मातीचा ओलसर सुगंध, चिंब भिजलेली, गच्च हिरवळ, आणि नदीकाठची छोटीशी बाजारपेठ – हे सगळं चित्र डोळ्यासमोर अगदी जिवंत उभं राहतं.
गावातले अनुभव हे केवळ आठवणी नव्हेत, ते एक भावविश्व असतं.
पाऊस हा तिथे ऋतू नसतो, तो सखा असतो… गावात पावसाळा म्हणजे एक स्वप्नवत दृश्य – आकाशात गर्द काळे ढग, त्यातून वीजेचा चमकदार लखलखाट, मागोमाग होणारा गडगडाट – आणि या सगळ्याचा अंगावर रोमांच आणणारा नाद! जणू निसर्गच स्वतःची एखादी वेब सिरीज सादर करत असतो.
आमचं गाव डोंगराच्या कुशीत विसावलेलं. इथं पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही, तो निसर्गाचा आशीर्वाद असतो. पहिल्या सरी कोसळतात, ओढे खळाळतात, डोंगर पुन्हा हिरवेगार होतात, आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य फुलतं. बैलजोडी रानात उतरते, शेतकऱ्याचे पाय मातीत खोलवर रुततात – ते फक्त शेतीचं काम नसतं, ते पवित्र कर्म असतं. बीज रोवण्याची ती पहिली घडी म्हणजे जमिनीच्या गर्भात आशेचा अंकुर रोवण्याची सुरुवात.
“पाऊस म्हणजे केवळ आभाळातून येणारं पाणी नाही,
तो शेतकऱ्याच्या डोळ्यांतलं आशेचं प्रतिबिंब असतो.”
पावसाळ्यात गावाचं रूपच बदलून जातं. सर्वत्र पसरलेली हिरवळ, रानफुलांनी सजलेल्या वाटा, आणि घराच्या पत्र्यावर कोसळणारा न थांबणारा पाऊस… विज गेल्यावर येणारा शांत अंधार आणि अचानक कापणारा विजेचा नाद – हे सगळं आठवलं की अंगावर शहारा येतो, आणि मन पुन्हा त्या आठवणीत हरवून जातं.
पाऊस आणि गावाचं नातं हे फक्त निसर्गाचं नाही, ते भावनांचं आहे.
पाऊस सगळं धुऊन टाकतो, तसंच गावातला पाऊस मनातली धूळ झटकून मन शांत करतो, सच्चं करतो. आठवणी उजळवतो, आणि आपण पुन्हा त्या बालपणाच्या गावात शिरतो.
शहरात राहताना हे सगळं आठवलं की मन हळवं होतं. शहरात पाऊस म्हणजे वाहतूक कोंडी, कीचकट चिखल… पण गावात पाऊस म्हणजे सण, उत्सव, निसर्गाचा महाप्रसादच जणू!
म्हणूनच कुणीतरी किती सुंदर म्हटलं आहे
“काय सांगू राणी, मला गाव सुटेना…
किती सांगू राणी, मला गाव सुटेना…”