(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राजापूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कोदवली नवीन धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीपथावरील कामांचा सविस्तर आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान धरणाच्या उर्वरित १७ गेटचे काम, एम-३० काँक्रीटचे बांधकाम, सीपीसीसी ट्रीटमेंट, पाईपलाईन टाकण्याची प्रक्रिया, धरणावर जाण्यासाठी प्रस्तावित काँक्रीट पोहोच रस्ता तसेच विद्युतीकरणाची कामे यांची पाहणी करण्यात आली. कामांची गुणवत्ता, गती आणि निश्चित कालमर्यादेत पूर्तता होण्याबाबत नगराध्यक्षा खलिफे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना स्पष्ट सूचना दिल्या. कोदवली नवीन धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर धरणात पाणीसाठा सुरू होईल आणि त्यामुळे राजापूर शहराला भेडसावणारी पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या पाहणीप्रसंगी राजापूर नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, स्वप्नील पड्यार, दिवाकर खडपे तसेच कंत्राटदार गदगू जाधव आदी उपस्थित होते. नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने हे धरण महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

