(राजापूर / तुषार पाचलकर)
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या अंतर्गत, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे आणि रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या वतीने अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी नियोजन व त्याचा लाभ यावर प्रबोधनात्मक कार्यक्रम ‘जल हे विश्व’ १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता पाचल-तळवडे येथील प्रभावती हॉल येथे आयोजित करण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्वात मोठा अर्जुना प्रकल्प पूर्ण झाला असून त्यादरम्यान अंशतः करक व पूर्णतः पांगरी गावांचे विस्थापन करण्यात आले आहे. शासनाने सर्व प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मालमत्तेची नुकसानभरपाई आधीच दिली असून चार ठिकाणी पुनर्वसन वसाहतीही स्थापन करण्यात आल्या आहेत, जिथे सर्व प्रकल्पग्रस्तांचे विस्थापन करण्यात आले आहे.
अर्जुना प्रकल्पाच्या दोन्ही बाजूंनी बांधलेल्या बंदिस्त पाईपलाईनमार्फत परिसरातील शेतकऱ्यांना भातशेतीसाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाईपलाईनचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाण्याचे नियोजन कसे करावे, यावर प्रबोधन केले जाणार आहे.
यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील आणि परिसरातील गावांच्या सरपंचांना खास निमंत्रण दिले असल्याचे रत्नागिरी पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी कळवले आहे.

