(देवरूख / सुरेश सप्रे)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या वतीने राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे सादर करण्यात आले. हे निवेदन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी वेळोवेळी केलेल्या अरेरावीपूर्ण, अविचारी आणि अपमानास्पद विधानांमुळे राज्यात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. शेतकऱ्यांविषयी वापरलेली अर्वाच्य भाषा, पंचनाम्यांबाबत अधिकार्यांना दिलेली उद्धट सूचना आणि कर्जमाफीबाबत केलेली हेटाळणीयुक्त वक्तव्ये यामुळे शेतकरी वर्गात रोष निर्माण झाला आहे. त्यात भर म्हणजे, २० जुलै २०२५ रोजी अधिवेशन सुरू असताना सभागृहात पत्त्यांचा ‘रमी’ जुगार खेळत असल्याचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांद्वारे समोर आला, ज्यामुळे संपूर्ण राज्याचे, विशेषतः कृषी खात्याचे नाव बदनाम झाले आहे. म्हणूनच, त्यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे मंत्री पदाची मर्यादा उल्लंघित झाल्याने आणि राज्याची प्रतिमा मलीन झाल्याने, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी पक्षातर्फे निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे करण्यात आली.
निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांच्यासह माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, रत्नागिरी शहराध्यक्ष निलेश भोसले, संगमेश्वर तालुकाध्यक्ष बाबा साळवी, तसेच निलेश भुवड, अरीफ जेठी आदी पदाधिकारी उपस्थित होते.