(रत्नागिरी)
जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातून शहरालगतच्या परिसरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील शिळ-वाडकरवाडी येथे भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. या घरफोडीत अज्ञात चोरट्याने सुमारे ५ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.
ही घटना शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.३० या वेळेत घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश नारायण भातडे (वय ५२, रा. शिळ-वाडकरवाडी, रत्नागिरी) हे आपल्या कुटुंबियांसह बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या पाठीमागील लाकडी दरवाजाला जोरात धक्का देत मधली व वरची कडी उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट फोडून त्यामधील मौल्यवान दागिने चोरून नेले.
चोरट्याने ५३.४३० ग्रॅम वजनाचे सुमारे ४ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र (सोन्याचे पेंडंटसह), १२ ग्रॅम वजनाचा सुमारे ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार तसेच ३ ग्रॅम वजनाची अंदाजे ३० हजार रुपयांची सोन्याची अंगठी असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
या घटनेची तक्रार निलेश भातडे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, तसेच संशयितांचा शोध घेण्याचे काम शहर पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, रत्नागिरी शहर व लगतच्या भागात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

