(नवी दिल्ली)
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं प्रतिकाराची ठोस भूमिका घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतलं. या कारवाईनंतर देशाचं पहिलं संसदीय अधिवेशन – पावसाळी अधिवेशन – आजपासून (21 जुलै) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अधिकच महत्त्वाचं ठरणार आहे.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी माहिती दिली की पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान होणार आहे. यापूर्वी हे अधिवेशन 12 ऑगस्ट रोजी संपणार होतं, मात्र आता ते एका आठवड्याने वाढवण्यात आलं आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 13 आणि 14 ऑगस्ट रोजी संसदेमध्ये कोणतीही बैठक होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये काही आठवड्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय आणि एक नेपाळी नागरिक ठार झाला होता. या हल्ल्यानंतर भारत सरकारने तातडीने कारवाई करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं. या मोहिमेदरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन सर्वपक्षीय बैठकाही घेतल्या, ज्यात सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. आता ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचं हे पहिलं संसदीय अधिवेशन असल्यामुळे, चर्चेचं आणि निर्णयांचं केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
संसदेत ‘क्रिकेटपटूंचा’ प्रवेश
या अधिवेशनात काही माजी भारतीय क्रिकेटपटूंनी संसदेत प्रवेश केला आहे. कीर्ती आझाद आणि युसूफ पठाण हे दोघंही तृणमूल काँग्रेसकडून पश्चिम बंगालमधून लोकसभेत निवडून आले आहेत. तसेच, दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग देखील आम आदमी पक्षाकडून राज्यसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. देशासाठी मैदानात यश मिळवलेले हे खेळाडू आता संसदेत कशा प्रकारे “खेळतील” हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.