(मुंबई)
उद्या १ नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकांना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मोर्चा आझाद मैदानात होणार असून तिथे वाहनतळाची सोय नसल्याने “मी देखील ट्रेननेच मोर्चासाठी येणार,” असे राज ठाकरे यांनी गुरुवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहातील मेळाव्यात जाहीर केले.
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले, “लोक आपल्याला मतदान करत असले तरी मतदार यादीतील घोळ आणि ईव्हीएममधील त्रुटींमुळे अनेकांना पराभव पत्करावा लागतो. या भानगडी दूर झाल्याशिवाय खरी लोकशाही टिकणार नाही. अजून एक वर्ष लागले तरी चालेल, पण मतदार याद्या स्वच्छ व्हायलाच हव्यात. आज सत्तेवर असलेल्यांचा विजय ‘मॅच फिक्सिंग’सारखा आहे. एकेकाळी मॅच फिक्स करणाऱ्यांना क्रिकेटमधून बाहेर काढलं, पण येथे कोणीच कारवाई करत नाही.”
राज ठाकरे पुढे म्हणाले, “सुट्टी टाकून मोर्चात या. बॉस सुट्टी देत नसेल तर शनिवारपुरते एक मत त्याच्या गालावर द्या! तोसुद्धा मतदार आहे, त्यालाही सोबत घ्या.”
राहुल गांधी यांनी विविध मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज मागितल्यावर निवडणूक आयोगाने ती ‘खासगी माहिती’ असल्याचे सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, “मतदार कसला खासगी असतो? त्याचे मतदान खासगी असू शकते, पण मतदार नाही. याला मर्यादा असायला हवी.”
ते पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या विभागाने मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजगड आणि शिवनेरीवर ‘नमो टुरिझम सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सहन होणार नाही. सेंटर उभं केलं की फोडून टाकू. सत्ता डोक्यात गेली की काय होतं, ते पहा. मुंबईतील जागा अदानींना देत बसलेत.”
राज ठाकरे म्हणाले, “मी महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराला सांगतो, एक नोव्हेंबरचा मोर्चा दणक्यात झाला पाहिजे! मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार नावे काढलीच पाहिजेत. हा प्रत्येकाच्या भविष्यासाठीचा मुद्दा आहे. ही लढाई महाराष्ट्र लढवणार आहे, आणि मी स्वतः लोकलने येणार आहे.”

