( राजापूर )
तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. कर्मचारीच वेळेवर कार्यालयात उपस्थित नसल्याने जमिनीचे नकाशे, उतारे आणि अन्य आवश्यक कागदपत्रांसाठी नागरिकांना महिनोन्महिने कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मात्र, त्यांना हातात काहीच लागत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.
राजापूर तहसील कार्यालयाच्या बाजूलाच वसलेले तालुका भूमी अभिलेख कार्यालय सध्या केवळ नावापुरते उरले आहे. केवळ एक-दोन कर्मचारीच उपस्थित असतात, तर इतर सर्व टेबल्स रिकाम्या अवस्थेत असतात. अधिकारी वर्ग तर कधीच कार्यालयात दिसत नसल्याचे चित्र आहे. या कार्यालयात नागरिकांनी चौकशी केली असता, साहेब बाहेर गेलेत, सर्व कर्मचारी मोजणीला गेले आहेत, अशी उत्तरं सर्रासपणे ऐकवली जातात. विशेष म्हणजे, तालुका भूमी अभिलेख अधिकाऱ्यांची केबिन कायम रिकामी असून, याबाबत विचारणा केली असता मॅडमनी माझ्याकडे चार्ज दिला आहे, असे थातूरमातूर स्पष्टीकरण दिले जाते.
स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी जमिनीत व्यवहार करणाऱ्या दलालांसाठी तत्पर असतात, मात्र सामान्य नागरिकांसाठी मात्र कोणतीही मदत करत नाहीत. दुपारनंतर चहाच्या निमित्ताने बाहेर गेलेले कर्मचारी उशिरापर्यंत परत येत नाहीत, अशीही तक्रार वारंवार ऐकवली जात आहे.
या कार्यालयात मंजूर पदांची माहिती, रिक्त पदांची यादी, रजिस्टर इत्यादी बाबतीत कोणतीही पारदर्शकता नाही. परिणामी, “या कार्यालयाला कोण वाळी आहे का?”, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. महिनोन्महिने कागदपत्रांच्या मागे धावूनही काही मिळत नसेल, तर सर्वसामान्य नागरिक जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तातडीने चौकशीची गरज
राजापूर तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील ही परिस्थिती कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. स्थानिक प्रशासनाने याची तपासणी करून तातडीने सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.