( रत्नागिरी /प्रतिनिधी )
गेली दोन वर्षे रखडलेल्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, पहिल्या टप्प्यात संवर्ग एक मधील ९५ शिक्षकांची बदली निश्चित करण्यात आली आहे. या प्रक्रियेस चालना देण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी बदलीस पात्र शिक्षकांची यादी जाहीर केली आहे.
ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार, गटशिक्षणाधिकाऱ्यांना येत्या चार दिवसांत रिक्त पदांची नोंद बदली पोर्टलवर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिणामी, अनेक शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील बदलीस पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये विशेष संवर्ग एक व दोन मधील शिक्षकांचाही समावेश आहे. ही यादी व्हिनस कंपनीमार्फत ग्रामविकास विभागाच्या बदली पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शिक्षक बदली प्रक्रियेतील विलंबामुळे जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांची संख्या यंदा मोठी होती. मागील दोन वर्षांत बदल्या न झाल्याने शिक्षक संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. दरम्यान, काही शिक्षकांनी आंतरजिल्हा आपसी बदल्यांच्या बाबतीत न्यायालयात धाव घेतल्याने प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती मिळाली होती. आता मात्र न्यायालयीन मर्यादा पार करत बदल्यांचा पहिला टप्पा पार पडला आहे.
संचमान्यतेवरून उठलेले वाद आणि अतिरिक्त शिक्षकांचा पेच
३१ मेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित असतानाही विविध जिल्ह्यांतील शिक्षकांनी आक्षेप घेतल्याने बदली प्रक्रियेत अडथळे आले. त्यातच संचमान्यतेचा प्रश्नही कळीचा ठरला. नवीन संचमान्यता आता विद्यार्थ्यांच्या वैध आधार नोंदींवर आधारित करण्यात आल्याने राज्यभरात सुमारे २५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरले. या बदल्यांमध्ये संचमान्यता आणि रिक्त पदांचा समन्वय साधणे आव्हानात्मक ठरत आहे. दरम्यान, उर्वरित संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, शिक्षक व पालकवर्ग याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.