(मुंबई)
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, यंदाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत ४९ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांपैकी किती जण प्रत्यक्ष प्रवेश घेतात, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. या आधी पहिल्या यादीत ८२ हजार ८३३ विद्यार्थ्यांची नावे घोषित करण्यात आली होती, त्यापैकी ४२ हजार २११ विद्यार्थ्यांनी (५०.९६ टक्के) विविध आयटीआय संस्थांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेतला.
या प्रवेश प्रक्रियेचे आयोजन राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत (DVET) करण्यात येते. यंदा राज्यातील ९९२ आयटीआय संस्थांमध्ये एकूण १,४६,८२० जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये शासकीय संस्थांमध्ये ९४,२९६ जागा आणि खासगी संस्थांमध्ये ५२,५२४ जागा आहेत. या प्रवेशासाठी राज्यभरातून १,७३,६७३ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते.
दुसऱ्या फेरीतील यादीनुसार, ४२,०५७ विद्यार्थ्यांची निवड शासकीय आयटीआयसाठी, तर ७,२८३ विद्यार्थ्यांची निवड खासगी संस्थांसाठी झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली असून मंगळवारपर्यंत चालणार आहे. पहिल्या फेरीप्रमाणेच दुसऱ्या फेरीतही मोठ्या संख्येने विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करतील, अशी अपेक्षा डीव्हीईटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.