(ठाणे)
दिवा रेल्वे स्थानकात एका महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करताना तिला ट्रेन खाली ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. महिलेनं विरोध केल्यामुळे आरोपीने तिला धावत्या मालगाडीखाली ढकलून देण्यात आले. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, ठाणे लोहमार्ग पोलिसांनी राजन सिंह (वय ३९) या आरोपीला अटक केली आहे. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तिची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
घटनास्थळाचा तपशील असं आहे की, दिवा स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ आणि ८ वर शुक्रवारी पहाटे सफाई कर्मचारी काम करत असताना, फलाट क्रमांक ५ आणि ६ वर आरडाओरड ऐकू आली. एका पुरुष आणि महिलेत जोरदार वाद सुरु होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, त्या पुरुषाने महिलेच्या गळ्यात दोन्ही हातांनी समोरून पकडून तिला धक्काबुक्की केली. महिला त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तिचा प्रतिकार पाहून आरोपीने तिला जवळून धावणाऱ्या मालगाडीखाली ढकलले, यामध्ये ट्रेनखाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरील त्याच रेल्वे रुळांवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, तिथे तैनात असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव राजन सिंह असून, तो दिवा शहरातील रहिवासी असल्याचे सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडितेची पूर्वीची ओळख नव्हती. आरोपीने तिचा पाठलाग करत असताना तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनी सांगितली. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.