( भंडारा )
राज्यात महिला तसेच मुलीवर अत्याचार हत्याच्या घटना ताज्या असताना भंडारातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. भंडारा येथील एका शासकीय वैद्यकीय महिला नर्सिंग कॉलेजच्या प्रभारी मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींना उत्तीर्ण करण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याच्या संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे. किरण मुरकूट असे नराधम आरोपी प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे.
एका विद्यार्थिनीने घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितल्यावर पालकांनी महाविद्यालयात येऊन त्या प्रभारी मुख्याध्यापकाला चोप दिला आहे. पाच ते सहा मुलींच्या व्हॉटसॲपवर मेसेज करून किरण मुरकूट नावाच्या प्रभारी मुख्याध्यापकाने त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. व्हॉटसॲप मेसेजचे प्रिंट आऊट पोलिसांकडे देण्यात आले आहेत.
प्रभारी मुख्याध्यापक किरण मुरकूटे हा मुलींसोबत मागील अनेक दिवसापासून अश्लील वर्तन करत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी महाविद्यालयात येऊन नराधम शिक्षकाला चांगलेच चोप दिला. त्यानंतर भंडारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी प्रभारी मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी किरण मुरकूटे यांचे प्रताप समोर आल्या नंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मुख्याध्यापकाच्या रूमला सील केलं आहे. व किरण मुरकूट याच्याकडे असलेल्या चार्ज काढून घेण्यात आला आहे. त्याच्याविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.