(पनवेल)
खारघरमधील सेक्टर ३४ येथील ‘ट्रायसिटी’ इमारतीच्या वरच्या मजल्यांवर रविवारी दुपारी लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी सुमारे १ वाजून २० मिनिटांनी १० ते १४ व्या मजल्यांदरम्यान वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली.
रविवारी सुट्टी असल्यामुळे काही कुटुंबे खरेदीसाठी बाहेर तर काही व्यक्ती घरी होते. दुपारी इमारतीमधून धूर येत असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ याची माहिती खारघर अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते. इमारतीच्या डक्टच्या माध्यमातून ही आग सोळाव्या मजल्यावरपर्यंत पोहोचली. या वेळी महावितरणकडून तत्काळ सेक्टर ३४ मधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला तर अग्निशमन जवानांनी शिडीच्या साह्याने वरील मजल्यावर अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी धुराचा त्रास झाल्याने चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये — सुमन कुमारी नीरज भारद्वाज (३१), वाणी नीरज भारद्वाज (९), तेजस्वी राजेश कुमार सिंग (१९), यशस्वी राजेश कुमार सिंग (१६) यांचा समावेश असून, त्यांना खारघर येथील मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय सूत्रांनी त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
अग्निशामक दल आणि पोलिसांच्या तत्पर कार्यवाहीमुळे मोठे नुकसान टळले. खबरदारी म्हणून इमारतीतील रहिवाशांना तात्पुरते बाहेर काढण्यात आले होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, पुढील तपास खारघर पोलिसांकडून सुरू आहे.

