(पुणे)
सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत असून, त्याचे नवे प्रकार सतत समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक सायबर फसवणूक पिंपरी-चिंचवड शहरातून समोर आली आहे. ‘RTO Traffic Challan.apk’ नावाच्या बनावट अॅपमुळे अनेक नागरिकांचे मोबाईल हॅक करण्यात आले असून त्यांच्या बँक खात्यांमधील रक्कम सायबर गुन्हेगारांनी लंपास केली आहे. या प्रकारात नागरिकांच्या मोबाईलमध्ये हे बनावट अॅप इन्स्टॉल होताच, त्यांचे संपूर्ण फोनताबा हॅकर्सच्या ताब्यात जातो. यानंतर मोबाईलमधील वैयक्तिक माहिती, बँक तपशील, ओटीपी, ई-मेल आयडी आणि पासवर्ड अशा सर्व संवेदनशील माहितीचा गैरवापर केला जातो.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावरून ‘RTO Traffic Challan.apk’ नावाची एक फाईल नागरिकांना पाठवली जात आहे. ही फाईल सरकारच्या वाहतूक विभागाशी संबंधित असल्याचा बनाव करून नागरिकांकडून ती डाऊनलोड करून घेतली जाते. अनेक नागरिक कोणतीही खातरजमा न करता ती इन्स्टॉल करतात आणि त्याच क्षणी त्यांच्या मोबाइलवरील नियंत्रण हॅकर्सकडे जाते.
हॅकर्स या अॅपच्या मदतीने वापरकर्त्याच्या मोबाइलमधून बँक खात्याशी संबंधित सर्व माहिती गोळा करतात. त्यानंतर ते ई-सिमसाठी विनंती करतात आणि वापरकर्त्याच्या नावावर असलेला मोबाइल क्रमांक स्वतःच्या ताब्यात घेतात. यामुळे बँकेकडून येणारे OTP आणि इतर सर्व महत्त्वाचे संदेश थेट हॅकर्सकडे पोहोचतात. OTP चा वापर करून ते इंटरनेट बँकिंगद्वारे बँक खात्यातून पैसे चोरतात. सायबर पोलिसानी सांगितले की, अशा प्रकारे आतापर्यंत १५ हून अधिक नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. काही प्रकरणांमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नागरिकांनी कोणतेही थर्ड पार्टी अॅप, विशेषतः .apk फाईल, मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नयेत. सरकारशी संबंधित माहिती तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळच वापरावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. वाहतूक चालानाची खरी माहिती पाहण्यासाठी mahatrafficechallan.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ वापरणे सुरक्षित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात एका चुकीच्या क्लिकमुळे तुमचे संपूर्ण आर्थिक व्यवहार अज्ञात हॅकर्सच्या ताब्यात जाऊ शकतात. त्यामुळे मोबाईलमध्ये अॅप इन्स्टॉल करताना, कोणतीही लिंक ओपन करताना किंवा अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या मेसेजवर क्लिक करताना नागरिकांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे.” अशा घटना सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहेत आणि नागरिकांनी यामधून योग्य तो बोध घ्यावा, कोणतीही शंका असल्यास नागरिकांनी तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.