(ठाणे )
राज्यातील महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक महापालिकांमध्ये महायुतीला स्पष्ट आघाडी मिळाली आहे. ठाणे महानगरपालिकेतही महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असून, १३१ पैकी तब्बल ६९ महिला नगरसेविका निवडून येणे ही विशेष बाब ठरली आहे.
दरम्यान, ठाण्यातील मुंब्रा परिसरातून निवडून आलेल्या AIMIM च्या तरुण नगरसेविका सहर शेख यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निवडणुकीतील विजयानंतर दिलेल्या ‘कैसे हराया…’ या भाषणामुळे त्या चर्चेत आल्या असून, या वक्तव्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावल्याचा आरोप केला जात आहे.
वॉर्ड क्रमांक ३० मधून विजय
मुंब्रा येथील वॉर्ड क्रमांक ३० मधून AIMIM च्या हिजाब परिधान करणाऱ्या तरुण नेत्या सहर शेख नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या विजयानंतर दिलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय म्हणाल्या सहर शेख?
व्हिडीओमध्ये सहर शेख म्हणतात, “आम्हाला कोणाच्याही वरदहस्ताची गरज नाही. ज्यांना वाटत होतं की आम्ही त्यांच्यावर अवलंबून आहोत, त्यांच्या अहंकाराला आम्ही मातीमोल केलं आहे. आम्ही कोणाच्या बापाच्या मेहेरबानीवर नाही, तर फक्त अल्लाहवर विश्वास ठेवतो.”
पुढे त्या म्हणतात, “पाच वर्षांनी मुंब्रा पूर्णपणे हिरवं करायचं आहे आणि विरोधकांना दारुण पराभव स्वीकारायला भाग पाडायचं आहे.” या वक्तव्यामुळेच वादाला तोंड फुटले.
पोलिसांची नोटीस, कडक समज
‘कैसे हराया’ आणि ‘मुंब्रा हिरवं करू’ या वक्तव्यांमुळे काही नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावली असून, भविष्यात कोणाच्याही भावना दुखावतील असे वक्तव्य किंवा भाषण करू नये, अशी कडक समज देण्यात आली आहे. ही कारवाई खबरदारीचा उपाय असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे

