(नागोठणे)
अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या सुकेळी खिंडीत सोमवारी (७ जुलै) दुपारी सुमारास भीषण अपघात घडला. नागोठणे बाजूकडील वळणावर वाहनाचा ताबा सुटल्याने टीव्हीएस एनटॉर्क स्कूटर रस्त्याच्या कडेला घसरली. या अपघातात क्रिश देवा साउथी (वय २०, मूळ नेपाळ, सध्या रा. मुंबई) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेली जास्मिन इकबाल इंद्रेशी (वय १८, रा. घणसोली, ठाणे) ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सुकेळी येथील बी.सी. जिंदाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, क्रिश आपल्या टीव्हीएस एनटॉर्क (क्र. MH 43 CJ 7702) स्कूटरवरून मुंबईकडे जात होता. विजय हॉटेलसमोरील वळणावर उतार असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. स्कूटर थेट डिव्हायडरला आदळून रस्त्याच्या कडेला घसरली. या धडकेत क्रिशच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व स्थानिक मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांनाही बी.सी. जिंदाल रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी क्रिशला मृत घोषित केले, तर जास्मिनच्या डोक्याला गंभीर दुखापत व उजव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदर प्रकरणात मोटार वाहन अधिनियम १८४ अंतर्गत कलम १०६, २८१, १२५A, १२५B अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस हवालदार रुहीकर पुढील तपास करीत आहेत.

