(नवी दिल्ली)
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. आर्यन खान दिग्दर्शित ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजमधून आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत दाखल केलेला मानहानीचा दावा दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी, दि. २९ जानेवारी रोजी फेटाळून लावला.
समीर वानखेडे यांनी या वेब सीरिजमधील काही दृश्यांमधून आपला अप्रत्यक्षपणे अपमान करण्यात आल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी शाहरुख खान, गौरी खान, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स इंडिया यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता.
या दाव्यात वानखेडे यांनी २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली होती. तसेच सीरिजमधील ड्रग्स प्रकरणाशी संबंधित मजकूर तात्काळ हटवण्याची मागणीही करण्यात आली होती. मिळणारी नुकसानभरपाई टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
वानखेडे यांनी सीरिजमधील एका विशिष्ट दृश्यावर आक्षेप घेतला होता. या दृश्यात एक नार्कोटिक्स अधिकारी नशा करत असलेल्या डीजेजवळ जातो आणि नंतर एका तरुणाकडे इशारा करत तो स्टार किड नाही, असे म्हणत एका स्टार किडला ताब्यात घेतो. या दृश्यातून आपल्यालाच लक्ष्य केले असून प्रतिमा मलिन करण्यात आल्याचा दावा वानखेडेंनी केला होता.
क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा संदर्भ
ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडेंनी आर्यन खानला अटक केली होती. मात्र, नंतर या प्रकरणात आर्यन खान यांची ड्रग्स आरोपांतून मुक्तता करण्यात आली. या घटनेशी साधर्म्य असलेली कथा वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आल्याने आपण बदनाम झाल्याचा दावा करत वानखेडेंनी न्यायालयात धाव घेतली होती.
दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
या प्रकरणाची सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार यांच्या एकल खंडपीठाने स्पष्ट केले की, या वादावर सुनावणी करण्याचा अधिकार दिल्ली उच्च न्यायालयाकडे नाही. संबंधित प्रकरण मुंबईशी संबंधित असल्याने हा दावा मुंबईतील सक्षम न्यायालयातच दाखल करता येईल, असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे अधिकारक्षेत्राच्या अभावामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला.

