(चिपळूण)
वीज ग्राहकांकडील चालू व थकीत देयकांची शंभर टक्के वसुली करा. जिल्ह्यातील प्रत्येक गाव वीजबिल थकबाकीमुक्त झाले पाहिजे. मार्च अखेरपर्यंत वरिष्ठांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट आदेश महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी दिले. उन्हाळ्यात विजेचा वापर वाढतो, त्यामुळे यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
चिपळूण येथे खेड व चिपळूण विभागांची संयुक्त आढावा बैठक झाली. या बैठकीस रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने, सहायक महाव्यवस्थापक अजय निकम, कार्यकारी अभियंते अभिजित सिकणीस, धनंजय भामरे, प्रमोद बाबरेकर, प्रणाली विश्लेषक समीर सिंघम, वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद कानडे आणि व्यवस्थापक (लेखा) गिरीश देसाई उपस्थित होते.
बैठकीत माहिती देताना पडळकर म्हणाले की, चिपळूण विभागातील १४,७३३ ग्राहकांकडे सुमारे १ कोटी ८६ लाख रुपये, तर खेड विभागातील १६,४३५ ग्राहकांकडे सुमारे २ कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करा आणि पुनरजोडणी शुल्क भरल्यानंतरच जोडणी द्या, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच वसुली वाढवण्यासाठी शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीस चिपळूण व खेड विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी, शाखा अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो: आढावा बैठक घेताना कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर, सोबत रत्नागिरी मंडलाचे अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने.

