( मुंबई )
राज्यातील सर्वाधिक उत्साहाने साजरा केला जाणारा दहीहंडी उत्सव अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. विविध गोविंदा पथकांचा सराव मोठ्या जोमात सुरू असून, अशातच गोविंदांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून गोविंदांसाठी विमा कवचाचा लाभ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत क्रीडा विभागाला आवश्यक निर्देश दिले असून, यंदाच्या वर्षी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याची तयारी शासनाने दर्शवली आहे.
या संदर्भात दहीहंडी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, गीता झगडे आणि अन्य पदाधिकारी सहभागी होते. त्यांनी गोविंदांचा वाढता सहभाग आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या अपघातांची जोखीम लक्षात घेता विमा कवचाची व्याप्ती वाढवण्याची विनंती केली.
महाराष्ट्र शासनाने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्यापासून या सणात सहभागी होणाऱ्या गोविंदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून ७५,००० गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येत होते. मात्र, यंदा ही संख्या १,५०,००० पर्यंत वाढवावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती, ज्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.