(दापोली)
दापोली तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी गुणगौरव समारंभ व सहविचार सभा नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दापोली येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास राज्य मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष श्री. संदेश राऊत, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. आयुब मुल्ला, तालुका अध्यक्ष श्री. संतोष हजारे, सचिव श्री. सुनील देसाई तसेच तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी, दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्काराने झाली. त्यानंतर बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी पुस्तक, प्रमाणपत्र व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर निवृत्त मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत पांढरे व श्री. सुनील गौड यांचा शाल, श्रीफळ, पुष्प व पुस्तक देऊन विशेष सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. नुकतेच पदभार स्वीकारलेल्या मुख्याध्यापक श्री. सत्यवान दळवी, श्री. अविनाश पाटील, श्री. हेमंत शिगवण, श्री. जोशी, श्री. फजलुद्दीन बामणे व श्री. प्रमोद गमरे यांचेही स्वागत करण्यात आले.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सानिका पवार, श्रवण धोपावकर, प्रतीक्षा दवंडे, अंजली यादव, आर्य कोंडविलकर आणि मुदब्बीर मुकादम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निवृत्त मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत पांढरे व नविन मुख्याध्यापक श्री. सत्यवान दळवी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी तालुका अध्यक्ष श्री. संतोष हजारे आणि जिल्हाध्यक्ष श्री. आयुब मुल्ला यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राज्य कोषाध्यक्ष श्री. संदेश राऊत यांनी केले.
यानंतर पार पडलेल्या सहविचार सभेत, तालुका अध्यक्ष श्री. संतोष हजारे यांनी मागील सभेचे इतिवृत्त सादर केले व सर्वानुमते मंजूर करण्यात आले. श्री. संदेश राऊत यांनी राज्य अधिवेशनाचा आढावा सादर केला, तर श्री. आयुब मुल्ला यांनी मुख्याध्यापकांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शनपर चर्चा केली. कार्यक्रमाच्या सांगता चहापान व अल्पोपहाराने झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आयोजकांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.