(चिपळूण)
रोटरी क्लब चिपळूणच्या उपक्रमशीलतेतून आणि सामाजिक बांधिलकीतून शहराच्या सौंदर्यात भर घालणारा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. क्लबने चिपळूण शहरात दोन आकर्षक आणि सौंदर्यवर्धक कारंज्यांची यशस्वी उभारणी केली आहे. या नव्या कारंज्यांमुळे शहराचा चेहरामोहरा अधिक देखणा बनत असून, नागरिकांना शांतता आणि आनंदाचा अनुभव देणारी ही नवी शहरी ओळख ठरत आहे.
ही दोन्ही कारंजी सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आली असून, शहराच्या सौंदर्यवर्धनाबरोबरच नागरी प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. यामध्ये चिंच नाका येथील “I ❤️ Chiplun” ही जागा विशेष आकर्षण ठरत आहे.
या उपक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. अविनाश पालशेतकर आणि क्लब सदस्यांनी आर्थिक व तांत्रिक सहकार्य करत पुढाकार घेतला. चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले, रोटे. डॉ. लेनी डिकोस्टा (District Governor 2026-27), रोटे. अजय मेनन (Deputy DRFC & DGSC), आणि रोटे. अभिजीत वालके यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाचे प्रकल्प समन्वयक (Project Chairmen) म्हणून वैभव रेडीज आणि प्रसाद सागवेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘आय लव्ह चिपळूण’ कारंज्याच्या उभारणीसाठी अपरांत डेव्हलपर्स, चिपळूण आणि साऊंड ऑफ म्युझिक, चिपळूण चे मालक शैलेश टाकळे यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाला श्रीरामभाऊ खरे, सीए विवेक रेळेकर सर, शैलेंद्र सावंत, मंगेश माटे, प्रशांत देवळेकर, दिनकर पवार, नितीन देवळेकर यांच्यासह अनेक मान्यवर रोटेरियन्स उपस्थित होते.
“शहराच्या सौंदर्यात भर घालणे व नागरिकांना शांततेचा अनुभव देणे, हाच या प्रकल्पाचा उद्देश होता. अशा अधिक सकारात्मक उपक्रमांची राबवणी आगामी काळात केली जाणार आहे,” असे अध्यक्ष रोटे. अविनाश पालशेतकर यांनी सांगितले.

