(संगमेश्वर / एजाज पटेल)
तालुक्यातील कुंभारखाणी (बु) येथे एका अंगणवाडीत मदतनीस पदावर एका महिलेची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत ग्रामस्थ प्रतीक सुर्वे यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी, संगमेश्वर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करताना संबंधित महिलेने आपल्या अपत्यांची चुकीची माहिती अर्जात नमूद केली असल्याचे म्हटले आहे. अर्जात फक्त दोन अपत्यांची माहिती दिली असली, तरी प्रत्यक्षात त्या महिलेला तीन अपत्यं असल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे. अपत्य मर्यादेच्या अटीचे उल्लंघन केल्याने त्यांची नियुक्ती संशयास्पद आहे, याबाबत माहिती घेण्यात यावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. सदर महिलेची नियुक्ती अपूर्ण माहितीच्या आधारेच झाली असल्याचा दावा करत, तक्रारदार प्रतीक सुर्वे यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधला असता, “महिलेने अर्जासोबत सादर केलेल्या स्वयंघोषणापत्राच्या आधारेच ही नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि, योग्य पुराव्यासह लेखी तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल,” अशी माहिती सबंधित विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, बालविकास प्रकल्प अधिकारी या तक्रारीवर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच लवकरच सर्व लेखी पुरावे संबंधित विभागाला सादर करणार असल्याचे तक्रारदार प्रतीक सुर्वे यांनी सांगितले.

