(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शिस्त ही थोपटून लादण्याची बाब नसून ती स्वभावातून येते, याचे मूर्तिमंत उदाहरण जिल्हा परिषद परिसरात पाहायला मिळत आहे. या ठिकाणी ना ट्रॅफिक पोलीसांची उपस्थिती, ना कुणी खास देखरेख करणारा कर्मचारी… तरीही वाहनांची पार्किंग व्यवस्था अचूक आणि शिस्तबद्ध दिसून येते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या परिसरात वाहनांची रेलचेल असते. अधिकारी, कर्मचारी, विविध खात्यांमध्ये कामानिमित्त येणारे नागरिक या सगळ्यांमुळे पार्किंगसाठी नेहमीच जागेची चढाओढ असते. पण विशेष म्हणजे, या गडबडीतही वाहनधारकांकडून ठरावीक जागेत, नीट रांगेत वाहन लावले जात आहे. यासाठी तैनात केलेले सुरक्षारक्षक काळजी घेत असून, गाड्यांची पार्किंग एकाच लाईंनमध्ये करण्याच्या सूचना त्यांच्याकडून देण्यात येत असतात. परिणामी, आतापर्यंत गोंधळाचे चित्र असलेल्या परिसरात शिस्तबद्धपणे वाहने उभी राहताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे, या परिसरात ना ट्राफिक पोलीस आहेत, ना देखरेख करणारा कुणी अधिकारी. तरीही अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण स्वतःहून नियम पाळताना दिसतात. त्यांच्या गाड्या एकसंध रांगेत, पार्किंगच्या ठरवलेल्या जागेवर उभ्या असतात, हे पाहून नागरिकही प्रभावित होतात. शासनसंस्थेमधील उच्चपदस्थ अधिकारी जर स्वतःहून शिस्त पाळत असतील, तर ही बाब समाजासाठी आदर्शवत ठरते. अशा वागणुकीतूनच शासकीय यंत्रणेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो.
शिस्त ही आदेशावर नव्हे, तर संस्कृतीवर आधारित असावी. जिल्हा परिषद परिसरात पाहायला मिळणारी ही दृश्ये याच विचाराला अधोरेखित करतात. मग, अशा शिस्तबद्धतेचा अवलंब इतर सार्वजनिक कार्यालयांमध्येही होईल का? हा आपसूक प्रश्न उपस्थित होतो.