(रत्नागिरी)
वर्क फ्रॉम होम कामाचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एकाला तब्बल २ लाख १४ हजार ३१४ रुपयांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार मारुती मंदिर परिसरात घडला असून, पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणुकीबाबत निरंजन सुशांत सावंत (सध्या रा. हिंदू कॉलनी, मारुती मंदिर, रत्नागिरी मूळ रा. जालगाव, दापोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ईशाना पटेल, कार्तिका सुरेश आणि त्रिशा जैन (तिघांचे पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईशाना पटेल, भारत ब्रेंडिंग जीनियसची एक्झिक्युटिव्ह असून आपल्याकरिता वर्क फ्रॉम होम कामाची संधी आहे, असा मेसेज निरंजन सावंत यांच्या मोबाइलवर आला. त्यानंतर निरंजन यांना कामाची संधी दिली.
दरम्यान, १८ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ईशाना पटेल, कार्तिका सुरेश, त्रिशा जैन यांनी वर्क फ्रॉम होम कामाचे आमिष दाखविले. सुरुवातीला काम करण्याचा मोबदला देऊन वारंवार संपर्क साधला. त्यानंतर कंपनी रेस्टॉरंट आणि हॉटेलची जनजागृती करण्याच्या नावाखाली निरंजन, त्यांची आई आणि मित्राच्या बँक खात्यातून २,१४,३१४ रुपये भरण्यास सांगून फसवणूक केली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.