(रत्नागिरी)
‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना’निमित्त रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के हायस्कूलतर्फे बुधवार, २६ जून रोजी जनजागृती रॅली व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०.२५ ते ११.५० या वेळेत शहर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या या उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत समाजात अंमली पदार्थांविषयी जागृतीचा संदेश दिला.
रॅलीची सुरुवात रा. भा. शिर्के हायस्कूलपासून झाली. माळनाका ओव्हर ब्रिज, हॉटेल सिल्व्हर स्वॅन, थिबा पॅलेस रोड फाटा, अद्वैत पेट्रोल पंप, माळनाका गार्डन, शासकीय विश्रामगृह असा रॅलीचा मार्ग ठरवण्यात आला होता. शाळेपर्यंत परत येईपर्यंत सुमारे ८० ते १०० विद्यार्थ्यांनी रॅलीत भाग घेतले. रॅलीदरम्यान ‘अंमली पदार्थांना दूर ठेवा, निरोगी जीवन जगवा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यानंतर शाळेच्या सभागृहात प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापक श्री. के. डी. कांबळे यांनी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे महत्त्व स्पष्ट करत कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सतीश शिवरकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, मानसिक, सामाजिक व शारीरिक परिणाम याविषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमास ८ वी ते १२ वीपर्यंतच्या वर्गातील सुमारे ३५० ते ४०० विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.