(जैतापूर / वार्ताहर)
सागरी पोलीस ठाणे, नाटे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, पोलीस निरीक्षक ए. बी. खेडकर यांची बदली रत्नागिरी जिल्हा विशेष शाखा (DSB) येथे करण्यात आली आहे. खेडकर यांनी गेल्या वर्षभरात सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच जनतेशी सुसंवाद साधत जनमाणसात पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण केला.
त्यांच्या कार्यकाळात विविध गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात आली. त्यामुळे त्यांची बदली झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक, व्यापारीवर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
खेडकर यांच्या जागी एपीआय प्रमोद वाघ यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी प्रमोद वाघ यांनी रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) मध्ये काम करत गुन्हे अन्वेषण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा सागरी पोलीस ठाण्याला निश्चितच होणार आहे.
तसेच, पोलीस ठाण्यात आणखी दोन नवीन पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीएसआय ठोंबरे हे नुकतेच नियुक्त झाले असून, पीएसआय झगडे हे पदोन्नतीनंतर याठिकाणी रुजू झाले आहेत. झगडे हे पोलीस विभागातील अनुभवी अधिकारी म्हणून परिचित आहेत.
सध्या सागरी पोलीस ठाणे, नाटे येथे एपीआय प्रमोद वाघ प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्या सहकार्याला पीएसआय ठोंबरे आणि पीएसआय झगडे यांची साथ मिळणार आहे. नव्या अधिकाऱ्यांच्या आगमनामुळे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेत आणि प्रतिसादक्षमतेत वाढ होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.