(खेड / प्रतिनिधी)
तालुक्यातील भडगाव येथील कै.प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिरची विद्यार्थिनी शर्ली शैलेश खेडेकर हिने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये ती तिसावी आली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, चेअरमन भालचंद्र कांबळे, जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढासर, संस्थेचे सदस्य रूपल पाटणे यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार समारंभाला तिचे वडील श्री. शैलेश खेडेकर यांचीही उपस्थिती होती. संस्थेचे चेअरमन श्री. कांबळेसर यांनी वैयक्तिक रोख पाचशे रुपयांचे बक्षीस कुमारी शर्ली हिला देऊन तिचा गौरव केला. यापूर्वीही घेण्यात आलेल्या अबॅकस, प्रज्ञाशोध यासारख्या स्पर्धांमध्येही तसेच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन तिने सुयश प्राप्त केले. तिच्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानदीपचे ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल संस्थाचालक आणि शिक्षक यांचेही सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.