(रत्नागिरी / प्रतिनिधी)
“मिनी मंत्रालय” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या खातेप्रमुखांच्या बदल्यांची मालिका सुरू झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासनात मोठे फेरबदल होत असून, नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे विभागांमध्ये नवसंजीवनी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी. यादव यांची जिल्हा परिषद पदावरून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी शितल कबनुरे-फुंड यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. दरम्यान, यादव यांची बदली मात्र जिल्ह्यांतर्गतच झाली असून, त्यांच्याकडे ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पद सोपविण्यात आले आहे.
ग्रामपंचायत विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांची बदली सातारा येथे झाली आहे. दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीत ठोस सुधारणा केल्या होत्या. त्यांच्या जागी सागर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, पाटील यांनी यापूर्वी राजापूर गटविकास अधिकारी म्हणून यशस्वी कारकीर्द बजावली आहे.
शिक्षण विभागातही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. शिक्षणाधिकारी बी.एम. कासार यांची बदली इचलकरंजी येथे झाली असून, त्यांनी मंगळवारी कार्यमुक्ती पत्करली. त्यांच्या जागी किरण लोहार यांची प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोहार यांचा माध्यमिक शिक्षण व विविध योजना विभागाचा कार्यानुभव शिक्षण प्रशासनात उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, चिपळूण येथे बांधकाम कार्यकारी अभियंता म्हणून हर्षल चव्हाण यांची सोलापूर येथून बदली करण्यात आली असून, ते देखील लवकरच पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. या बदल्यांमुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत नवे नेतृत्व आणि नवी कार्यपद्धती दिसून येण्याची शक्यता आहे. या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत काय सकारात्मक बदल घडून येतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

