(रत्नागिरी /प्रतिनिधी)
बृहन्मुंबईतील वाकोला परिसरातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा रत्नागिरी रेल्वे स्थानकावर यशस्वी शोध घेत त्यांना सुरक्षित ताब्यात देण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अल्पवयीन मुलींची वेळेत सुटका होऊन संभाव्य अनिष्ट घटना टळली.
वाकोला पोलीस ठाणे, बृहन्मुंबई शहर येथे गुन्हा क्र. १४६/२०२६ भा.न्या.सं. कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन अल्पवयीन मुली नेत्रावती एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने प्रवास करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष पथक रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रवाना करण्यात आले. प्राप्त सूचनांच्या आधारे पथकाने नेत्रावती एक्सप्रेसमध्ये शोधमोहीम हाती घेतली. अखेर ११ फेब्रुवारी रोजी या दोन्ही अल्पवयीन मुली रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात मिळून आल्या.
सदर दोन्ही मुलींना कोणतीही इजा न होता सुरक्षितरीत्या वाकोला पोलीस ठाणे, बृहन्मुंबई यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. वेळेवर मिळालेली गोपनीय माहिती आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तात्काळ कारवाई यामुळे हा गुन्हा उकलण्यास मदत झाली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय आंबेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपाराज पाटील तसेच महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल स्वाती राणे यांनी प्रत्यक्ष शोधमोहीमेत सहभाग घेतला.
अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत केलेली ही समन्वयित कारवाई ‘ऑपरेशन मुस्कान’च्या उद्दिष्टाला साजेशी ठरली असून रत्नागिरी पोलिसांच्या दक्षतेचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे.

