(रत्नागिरी / वार्ताहर)
तालुक्यातील शिळ गावात पाणीटंचाईचे गंभीर चित्र निर्माण झाले असून, पाण्याअभावी स्थानिक नागरिक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. नगरपरिषदेकडून धरणातील पाणी थेट पंपहाऊसमध्ये वळवण्यात येत असल्याने धरणपात्रात पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. परिणामी धरण बहुतांशी कोरड पडले असून, त्याचा फटका बागायती शेतीसह पर्यावरणालाही बसत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी या धरणात वर्षभर पाणी उपलब्ध असायचे. त्यामुळे परिसरातील शेती, विहिरी आणि भूजल पातळी टिकून राहायची. मात्र अलीकडील काळात धरणातील पाण्याचे थेट वळवण सुरू झाल्याने पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे.
पाईपलाईनचे काम दरवर्षी टप्प्याटप्प्याने करण्यात येत असल्याने नदीपात्राची योग्य देखभाल होत नाही. परिणामी, पात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचत आहे. या साचलेल्या गाळामुळे नदीची पाण्याची वहनक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्यास नदीतील पाणी वेगाने वाढते आणि ते पात्राबाहेर वाहू लागते.
नदीपात्र कोरडे पडल्याने परिसरातील जैवविविधतेवरही गंभीर परिणाम होत आहे. नदीकाठावरील झाडे, जलचर आणि पक्ष्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. पाण्यावर अवलंबून असलेले अनेक सूक्ष्म जीव आणि मासे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. नदीपात्रात किमान पाण्याचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी सोडण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित विभाग आणि नगरपरिषदेकडून अद्याप ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे ठरत आहे. अन्यथा, शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरण यांचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

