(पनवेल)
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण साखळी अपघात झाला असून, यामध्ये सहा वाहने एकमेकांवर आदळल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भाताण बोगद्यामध्ये बुधवारी संध्याकाळी घडला. मुंबईहून पुण्याकडे निघालेला छोटा हत्ती टेम्पो (MH12BF7228) पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने घसरून बोगद्यात पलटी झाला. या टेम्पोनंतर येणाऱ्या आयशर टेम्पो, खासगी ट्रॅव्हल्स बस आणि इतर वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने भीषण साखळी अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनांपैकी काहींनी बोगद्याच्या भिंतीला जोरदार धडक दिली.
या अपघातात परशुराम हेगडे (वय ४९, कोल्हापूर), लियाकत नालबंद (वय ७५), दीपक गावकर (वय ४२) आणि अनिल ढाकणे (क्रेन मदतनीस) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने पनवेल येथील एम.जी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. आयआरबी व्यवस्थापनाने पावसाळ्यात निसरड्या होणाऱ्या रस्त्यांसाठी तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे.

