(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरात सलग चौथ्या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या आषाढीवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “जय जय रामकृष्ण हरी”च्या गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर, वारकऱ्यांनी भक्तिभावाने सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. पंढरीच्या विठुरायाची ही वारी नित्य नवी असते. अनेक राज्ये आली-गेली, परकीय आक्रमणांनी थैमान घातले, पण विठोबाच्या वारीचं महत्त्व आजही तितकंच टिकून आहे. यंदा शहरातील दोन ठिकाणी रिंगण झाले. पारंपरिक वारकरी वेशभूषेत संत मंडळी अवतरली होती. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे चार हजारांहून अधिक वारकऱ्यांनी आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला.
वारीची सुरुवात सकाळी शक्ती मंदिर अर्थात मारुती मंदिर येथून झाली. ही वारी माळनाका, जयस्तंभ, एसटी स्टॅंड, राम आळीमार्गे बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात पोहोचली. सुमारे अडीच किलोमीटरचा हा प्रवास अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या वारीत महिला वारकरी पारंपरिक वेशात, डोईवर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. समोर वारकरी दल, त्यामागे पताका आणि तुळशी वृंदावन घेतलेले भक्त, आणि सर्वात पुढे टाळकरी असा शिस्तबद्ध मिरवणुकीचा क्रम होता.
वारी मार्गात माळनाका आणि जयस्तंभ येथे रंगतदार रिंगण झाले. रिंगणात सर्वात बाहेर पुरुष, मधल्या वर्तुळात माता-भगिनी, आणि सर्वात आत टाळकरी-वारकरी होते. विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भक्तांनी “विठोबा राया माझा”, “माऊली माऊली” अशा अभंग-भजनांनी वातावरण भक्तिमय केले.
या वारीत ‘मराठी बोला, लिहा, वाचा’, ‘मराठी माझी मातृभाषा’, ‘मी मराठी, महाराष्ट्राचा’ अशा घोषणांनीही गजर केला गेला. पाकिस्तानविरुद्ध उद्भवलेल्या युद्धसदृश परिस्थितीवरही काही वारकऱ्यांनी अभंग व गीतांमधून आपली भावना व्यक्त केली. मातृभाषेचा अभिमान आणि राष्ट्रप्रेम यांचं दर्शन यावेळी झाले. शहरातील हिंदू समाजाने या वारीचे आयोजन करून, अनेकांच्या मनातील ‘वारी एकदा तरी अनुभवावी’ ही अंतःकरणातील इच्छा पूर्ण केली. संपूर्ण वारी शिस्तबद्ध, भक्तिभावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडली. ही वारी रत्नागिरीतील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचं प्रतीक बनली होती.