(नागपूर)
पालकांचे क्षणिक दुर्लक्ष झाल्याने दीड वर्षांचा चिमुकला थेट वरच्या बर्थवरून खाली पडला. पालकांसह संपूर्ण कोचच्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना ट्रेन क्रमांक १२६२५ केरळ एक्स्प्रेसमध्ये रविवारी घडली. काही क्षण जोरात रडलेला चिमुकला एकदम शांत होताच आईचा आक्रोश सुरू झाला आणि डब्यात भीतीचे वातावरण पसरले.
नागपूर ते ईटारसी असा प्रवास करणारी हा परिवार थंडीमुळे वरच्या बर्थवर होता. यावेळी आईच्या कुशीत असलेला चिमुकला मध्यरात्री अचानक जागा झाला आणि आईच्या पायाच्या बाजूने बर्थवरून थेट खाली पडला. गाडी भोपाळहून पुढे निघाली होती आणि धावती गाडी, वरचा बर्थ, धाडकन खाली पडलेले बालक, आईचा हंबरडा आणि निपचित बालक यामुळे बोगीमध्ये मोठा गोंधळ सुरु झाला, सुरुवातीला काय झाले हे प्रवाश्यांना समजूनच आले नाही.
दरम्यान, एका प्रवाशाने रेल्वेच्या रनिंग स्टाफला ही माहिती दिली. संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत भोपाळ रेल्वे कंट्रोलला कळविले. कंट्रोलने तात्काळ ईटारसी स्थानकावर वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. गाडी ईटारसीत पोहोचताच डॉक्टरांनी चिमुकल्याची तातडीने तपासणी केली. काही मिनिटांतच त्याने उपचारांना प्रतिसाद दिला आणि हसू लागला. सखोल तपासणीनंतर बालक सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आवश्यक औषधे देऊन पुढील प्रवासास परवानगी देण्यात आली.
चिमुकला सुरक्षित असल्याचे समजताच आई-वडिलांसह नातेवाईकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. त्यांनी रेल्वे रनिंग स्टाफ आणि वैद्यकीय पथकाचे मनापासून आभार मानले आणि पुढील प्रवासाला निघाले.

