(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहराच्या पोलिस निरीक्षकपदावर प्रशासनाने मोठा बदल केला असून, पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांची बदली जिल्हा नियंत्रण कक्षात पोलिस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता विवेक पाटील यांची शहर पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील हे यापूर्वी सागरी सुरक्षा पथकात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत होते. ही बदललेली जबाबदारी नेहमीच्या फेरबदलाचा भाग असली तरी, मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या बदलीची चर्चा जोरदार सुरू आहे.
सतीश शिवरकर यांची पालघरहून रत्नागिरीत सात महिन्यांपूर्वी बदली झाली होती. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या कार्यकक्षेत एकामागून एक वादग्रस्त प्रकरणे ही घडली. त्यात सर्वाधिक गाजलेले म्हणजे एमआयडीसी परिसरात सापडलेल्या प्राण्याच्या अवशेषांवरून एका दाम्पत्यावर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला होता. परंतु नंतर त्यात सापडलेला पाय हा वासराचा नसून बोकडाचा असल्याचे स्पष्ट झाले, आणि या अति तत्परतेवर टीका होऊ लागली. पोलीस यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे निर्दोष व्यक्तींना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्याचबरोबर, किल्ल्यावरील वाहनांना लागलेली आग, ज्यात खासगी गाड्या जळून खाक झाल्या होत्या. ही घटना केवळ स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी नव्हे, तर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली होती. यात भर म्हणजे, पोलिस पाटील लिमये यांची आत्महत्या, जी शहरात खळबळ उडवून देणारी ठरली. या घटनेला बऱ्याचशा प्रशासनिक संदर्भांनी जोडले जात आहे. लिमये यांनी आत्महत्या का केली, याची सखोल चौकशी होणे अपेक्षित असतानाही, प्रशासनाकडून या प्रकरणात फारसे पुढे काही घडताना दिसले नाही, अशीही चर्चा आहे.
या सर्व घटनांमुळे नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात होती. काहींच्या मते, या प्रकरणांचा परिणाम म्हणूनच सतीश शिवरकर यांची बदली झाली असावी. विशेष म्हणजे, त्यांनी काही सकारात्मक कारवाया जसे की तडीपारीची कार्यवाही, घरफोडी उकलणे आणि बंदोबस्तात शिस्त यशस्वीरीत्या हाताळल्या होत्या. मात्र, चर्चीले जात असलेल्या संवेदनशील प्रकरणांतील निर्णय व अंमलबजावणीवरील टीकेने त्यांचा कार्यकाळ गाजला.
आता नव्याने नियुक्त झालेले पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्यावर या सर्व सामाजिक आणि प्रशासनिक अपेक्षांचे ओझे असेल. लोकांचा विश्वास पुन्हा मिळवणे, निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता राखणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही त्यांच्या कार्यकाळातील मोठी आव्हाने ठरणार आहेत. त्यांच्या पूर्वानुभवाचा उपयोग शहराच्या सुरक्षिततेसाठी कसा होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.