(दापोली)
दापोली तालुक्यातील आंजर्ले व केळशी समुद्रकिनाऱ्यांवर बुधवारी सकाळच्या सुमारास दोन अज्ञात पुरुषांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही असून दापोली पोलीस तपास करत आहेत.
पहिला मृतदेह आंजर्ले येथील गणपती विसर्जन पॉईंटजवळील समुद्रकिनारी आढळून आला. सुमारे ५० वर्षीय व्यक्तीने निळा टी-शर्ट परिधान केला असून, अर्धनग्न स्थितीत मृतावस्थेत आढळला. दुसरा मृतदेह केळशी येथील बापू आळीच्या मागील किनाऱ्यावर सापडला असून, त्याच वयाच्या अंदाजे ५० वर्षीय व्यक्तीने पांढरा टी-शर्ट परिधान केला होता. तोही अर्धनग्न अवस्थेत आढळून आला आहे.
दोन्ही मृत व्यक्ती मच्छीमार व्यवसायाशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, ओळख पटवण्यासाठी पोलीस विविध सूत्रांद्वारे तपास करत आहेत. दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत व्यक्तींच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.