(दापोली)
दापोली तालुक्यातील कर्दे येथील हॉटेल कल्पतरुजवळ शुक्रवारी रात्री सात ते आठ अज्ञात इसमांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला चढवून त्यांना मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. याप्रकरणी अक्षय अनिल मोरे (वय ३०, रा. पिंपरी-चिंचवड, पुणे) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी रात्री सुमारे साडेअकरा वाजता फिर्यादी अक्षय मोरे आणि त्यांचा मित्र राकेश चौधरी हे साहील बारमध्ये जेवण आटोपून आपल्या हॉटेलच्या रूमकडे परत जात होते. हॉटेल कल्पतरुजवळील पुलाजवळ पोहोचल्यावर त्यांच्या गाडीवर अचानक बॅटरीचा प्रकाश टाकण्यात आला. तिथे सात ते आठ अनोळखी इसम उभे असल्याचे त्यांना दिसले.
भीतीने त्यांनी गाडी थेट हॉटेलच्या पार्किंगमध्ये नेली. मात्र गाडीतून खाली उतरताच, त्या अज्ञात टोळक्याने धावत येत हाताच्या थपडा मारत त्यांना जबर मारहाण केली. यावेळी टोळक्याने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर अक्षय मोरे यांनी २७ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजून ६ मिनिटांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय झाली आहेत.