(दापोली)
तालुक्यातील पंचनदी कुणबीवाडी येथील मानसी महेंद्र नाचरे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ७लाख ५ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजण्याच्या मुदतीत घडली.
दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानसी नाचरे यांच्या घराच्या मागील दरवाजातून अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये असणारे लोखंडी कपाट कोणत्यातरी हत्याराने खोलून कपाटाची तिजोरी फोडून त्यामध्ये स्टीलच्या किटली व प्लास्टिकच्या डबीत ठेवलेले सुमारे ७ लाख ५ हजार रुपयाचे दागिने व पैसे चोरून नेले. यामध्ये १० हजार रुपये किमतीचा ११ ग्रॅम वजनाचा काळे मणी वाटी असलेले मंगळसूत्र, १० हजार रुपये किमतीचे ११ ग्रॅम वजनाचे दोन वाटी असलेले मंगळसूत्र, ५० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या कुडी जोड, ४० हजार किमतीचे ४ ग्रॅम वजनाचे कानातील कानपट्टी चैन, ४० हजार रुपये किमतीची लेडीज अंगठी, २० हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, ४० हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे अंगठी, ६० हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे जेन्ट्स सोन्याची चैन, १ लाख ५० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची लॉकेट असलेली सोन्याची चैन, ८० हजार रुपये किमतीची ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे अंगठी व ६ हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केले. याची खबर दाभोळ पोलीस स्थानकात मानसी नाचरे यांनी दिली आहे.

