(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावच्या शिमगोत्सवाला राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी मंगळवारी धुलीवंदनाचे औचित्य साधून सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मालगुंड येथील स्थानिक ग्रामस्थांसमवेत सहभागी होऊन शिमगोत्सवाचा आनंद घेतला. तसेच मालगुंड गावची ग्रामदेवता श्री चंडिका देवीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर आपली श्रद्धा अर्पण करीत आशीर्वाद घेऊन मनोभावे दर्शन घेतले. या भेटीत नामदार उदय सामंत यांचे मालगुंड येथील स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने आणि श्री चंडिका देवी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले.
मालगुंड गावची ग्रामदेवता श्री चंडिका देवीचा शिमगोत्सव मोठ्या भक्तीभावात, जल्लोषात आणि आनंदमय वातावरणात साजरा केला जातो. यामध्ये मालगुंड गावातील बारावाड्यातील ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने आणि एकोफ्याने सहभागी होतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा शिमगोत्सव मालगुंड मराठवाडी येथील देवीच्या सहाणेवर मंगळवारी मोठ्या भक्तिमय व जल्लोषी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार उदय सामंत यांनी सदिच्छा भेट दिल्याने मालगुंड गावातील ग्रामस्थांमध्ये चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांनी अनेक ग्रामस्थांशी संवाद साधून शिमगोत्सवाला शुभेच्छा दिल्या. नामदार उदय सामंत यांच्या सदिच्छा भेटीमुळे स्थानिक ग्रामस्थांचा शिमगोत्सवचा आनंद अधिक प्रमाणात द्विगुणीत झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी, विधानसभा संघटक प्रकाश साळवी, उपतालुका संघटक अभिषेक उर्फ भैय्या साळवी, शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य पूर्वा दुर्गवळी, मालगुंडचे शाखाप्रमुख अतुल पाटील,माजी सरपंच दीपक दुर्गवळी, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

