(दापोली)
तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथे विहिरीत पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. ५ जानेवारी) सकाळी उघडकीस आली. प्रीशा सुदेश वाडकर (वय २८, सध्या रा. गिम्हवणे उगवतवाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे.
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रीशा वाडकर ही मागील दोन वर्षांपासून आपल्या माहेरी आई प्रतिभा मोरे यांच्यासोबत राहत होती. तिची आई प्रतिभा मोरे या काही दिवसांपूर्वी सुनेच्या प्रसूतीसाठी मुंबई येथे गेल्या होत्या. रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास प्रीशा विहिरीत पडल्याची बाब परिसरातील निखिल जाडे याच्या निदर्शनास आली.

ही माहिती मिळताच निखिल जाडे याने तातडीने फोनद्वारे प्रीशाच्या नातेवाईकांना कळवले. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला रुग्णवाहिकेद्वारे तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती प्रीशाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

