(रत्नागिरी- संगमेश्वर /प्रतिनिधी )
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाट परिसरातील कळकदरा स्टॉपच्या पश्चिमेकडील खोल दरीत वसलेली धनगरवाडी (पूर्व) ही वस्ती आजही वीज, रस्ता अशा मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहे. अवघ्या नऊ कुटुंबांची ही आदिवासी वस्ती आजही अंधारातच जीवन जगत असून, शासन यंत्रणा आणि महावितरणचा विद्युतपुरवठा प्रकल्प या भागापर्यंत पोहोचलेला नाही.
या वस्तीत शेती व पशुपालन हा प्रमुख व्यवसाय असून जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता लक्षात घेऊन पूर्वजांनी हे ठिकाण निवडले. मात्र सध्याच्या पिढीला मूलभूत सुविधांचा अभाव भोगावा लागत आहे. जागेअभावी रस्त्याचे काम थांबले असून, महावितरणला हा भाग आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण देत वीजपुरवठा रखडवण्यात आला आहे.
२०१७ साली सात कुटुंबांनी वीज मीटरसाठीचे शुल्क भरले असूनही आठ वर्षांनंतरही विजेचा दिवा पेटलेला नाही. दरम्यान, लोकशाही दिन व जनता दरबारातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पोलिस पाटील रविंद्र फोंडे यांनी गतवर्षी देवरूख येथे झालेल्या जनता दरबारात वीजप्रश्न मांडला होता. त्यानंतर महावितरणच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली मात्र प्रत्यक्ष काम काहीच झाले नाही.
या वस्तीत राहणाऱ्या काही कुटुंबांनी मूलभूत सुविधा मिळत नसल्याने स्थलांतर पत्करले आहे. मात्र परिस्थितीमुळे काहींना आजही याच मातीत राहावे लागत आहे. ९० वर्षांची बनाबाई पांडुरंग फोंडे, त्यांचा मुलगा, सून व तीन नातवंडे मिळून सहा जण सध्या या वस्तीत राहतात. सभोवती घनदाट जंगल, बिबटे, रानरेडे, कोळसुंद्या यांचा मुक्त संचार आणि त्यात रात्रभर अंधार अशा भीषण परिस्थितीत हे कुटुंब दररोजचा दिवस ढकलत आहे.
“मी हयात असताना आमच्या घरी वीज येईल का?” असा आर्त सवाल बनाबाई फोंडे यांनी शासन दरबारी उपस्थित केला आहे. त्यांच्या डोळ्यांतील वेदना ही आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी वस्त्यांच्या वास्तवाची साक्ष देतात. सरकारच्या घराघरात वीज योजनेचे वारे या वस्तीपर्यंत पोहोचतील का, याकडे संपूर्ण भागाचे लक्ष लागले आहे.

