(विशेष प्रतिनिधी)
लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर कोकणात कमजोर झालेल्या ठाकरे गटाने आता कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी नव्या रणनीतीचा अवलंब केला आहे. ‘शिवबंधन कोकण परिक्रमा यात्रा’ हेच या प्रयत्नांचे प्रमुख माध्यम ठरणार आहे. या यात्रेची सुरुवात ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी रायगड किल्ल्यावरून खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. कोकणातील तीन जिल्ह्यांतून प्रवास करत ही यात्रा सिंधुदुर्गमध्ये समारोप घेणार आहे.
गेल्या काही निवडणुकांत अपयश आलेल्या ठाकरे गटात कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या निराशेला दूर करण्याचा उद्देश या दौऱ्यामागे आहे. महायुतीच्या बाजूने जोरदार वारे वाहत असतानाही, ठाकरे गट कोकणात पुन्हा पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षभरात ठाकरे शिवसेना कोकणात उतरत्या फॉर्मात दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात किंवा भाजपमध्ये सामील झाले. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे याचे ठळक उदाहरण. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर अधिक आहे. अनेक नेते अजूनही नाराज असून, संघटनात्मक कामात रुची घेताना दिसत नाहीत.
याउलट, सिंधुदुर्गमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने आंदोलनांद्वारे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाचे सुरुवातीचे आधारस्तंभ असलेल्या राजन तेली आणि परशुराम उपरकर यांच्या पुनःप्रवेशामुळे संघटनेत उत्साह संचारेल अशी अपेक्षा होती, मात्र अपेक्षित परिणाम अद्याप दिसून आलेले नाहीत.
नव्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकट करण्याची धडपड
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी शिवसेना भवन, मुंबई येथे कोकणातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. माजी आमदार नाईक, उपरकर आणि सतीश सावंत या बैठकीत उपस्थित होते. याच बैठकीत ‘शिवबंधन’ कोकण यात्रा आखण्यात आली असून, गणेशोत्सवपूर्वी हा दौरा पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या यात्रेदरम्यान काही तालुक्यांमध्ये जाहीर सभा होणार असून, नवीन पक्षप्रवेशांचीही शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढवायची की स्वतंत्रपणे, याबाबतही निर्णय या दौऱ्यात होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
महायुतीच्या ताकदीसमोर ठाकरे गट टिकणार का?
कोकणात १९९२ पासून २००५ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. त्यावेळी “जेथे नारायण राणे, तेथे सत्ता” हे समीकरण रूढ झाले होते. आता भाजप आणि शिंदे गटामध्ये युती झाली, तर महायुतीकडे दोन आमदारांची ताकद असून, जागावाटपात शिंदे गटाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. या दोघांच्या युतीसमोर ठाकरे गटाला सामना द्यावा लागणार आहे. भाजपची संघटनात्मक ताकद आणि शिंदे गटाची राजकीय उपस्थिती पाहता ठाकरे शिवसेनेसाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ अशी ठरण्याची चिन्हे आहेत.

