(रत्नागिरी / वार्ताहर)
तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब वृक्षाचा पहिला वाढदिवस आज (बुधवार) आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ६०० वृक्षरोपांचे मोफत वाटप करण्यात आले. ‘एक झाड आईच्या नावे’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’मधून प्रेरित उपक्रमात दिवंगत व्यक्तींच्या स्मरणार्थ झाडे वाटप करून समाजप्रबोधनाचा अनोखा साज चढवण्यात आला.
वाढदिवसाचे अनोखे स्वरूप
गेल्या वर्षी लावलेल्या कदंब झाडाला, श्री. शंकर कानडे यांच्याकडून ग्रंथालयाला दिलेल्या जमिनीच्या स्वरूपात दिलेल्या योगदानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या आईचे नाव कै. श्रीमती शकुंतला शंकर कानडे देण्यात आले. झाडाला पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर केकऐवजी ‘कलिंगड’ कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत जवळपास २०० नागरिक या उपक्रमात सहभागी झाले.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वृक्षप्रेमाची प्रेरणा
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना काजू, बेल, चिंच, आवळा, सोनचाफा, पेरू, खैर, साग, कडूनिंब अशा विविध प्रकारच्या वृक्षप्रजातींतील ६०० दर्जेदार रोपे मोफत वाटण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी – “झाडे लावा, झाडे जगवा”, “निसर्ग जपूया, आनंदी होऊया”, “उन्हातान्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलोपावली” अशा घोषणा देत परिसरात चैतन्य निर्माण केले. फलकांद्वारे पर्यावरण विषयक जागृतीही करण्यात आली.
ग्रंथालयाचा सुवर्ण महोत्सव
“श्री रत्नेश्वर ग्रंथालयाला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. एका पेटीत पुस्तके ठेवून सुरू झालेल्या या ग्रंथालयाने आता समृद्ध वाटचाल केली आहे. हे सर्व यापूर्वीच्या लोकांनी दिलेल्या योगदानामुळे शक्य झाले आहे. वाचनाशिवाय प्रगती शक्य नाही. त्यामुळे यावर्षी समाजोपयोगी उपक्रमांची मालिका राबवली जाणार आहे,” अशी माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी दिली.
याच कार्यक्रमात त्यांनी आपला वाढदिवसही झाडाच्या वाढदिवसाशी जोडत एक पर्यावरणाभिमुख संदेश दिला. “स्वतःचा वाढदिवस केक कापून नव्हे, तर झाड वाढवून साजरा करणे हीच खरी अभिव्यक्ती आहे,” असे मत सरपंच अमर रहाटे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पांचाळ, तर प्रास्ताविक मुकुंद जोशी (बाळासाहेब) यांनी केले. यावेळी उमेश कुळकर्णी (अध्यक्ष), सरपंच अमर रहाटे, सौ. ऋतुजा कुळकर्णी (ग्रामपंचायत सदस्य), दीपक जाधव (तंटामुक्ती अध्यक्ष), विलास पांचाळ (उपाध्यक्ष), प्रशांत रहाटे, सौ. स्मिता कुलकर्णी, अनंत जाधव, विश्वास धनावडे, दीपक रेवाळे (सदस्य), ग्रंथपाल केशव कुळकर्णी, लिपिक अविनाश लोगडे, व इतर मान्यवर उपस्थित होते.
नंदादीप नेत्रालयाचे विपणन अधिकारी हृषिकेश मयेकर, सेल्फलेस सर्विंग सोसायटीच्या संचालिका कोनिका दत्त, मानसशास्त्रज्ञ गौरी चाफेकर, आंबा व्यापारी बंड्या हर्षे, अनंत गोताड, मारूती लोगडे, तसेच माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सुतार सर, गायकवाड सर, अंगणवाडी सेविका व मदतनीस, मुख्याध्यापिका सौ. ढापरे यांचाही कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता.
सहभाग, स्मृती, पर्यावरण आणि समाजहित यांचे अनोखे संमेलन असलेला धामणसेतील ‘कदंब’ वाढदिवसाचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायक ठरणार आहे.