(नाशिक )
देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे सध्या सुट्ट्यांमुळे भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. शनिवार, रविवार, होळी आणि धुलिवंदन अशा सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. मात्र, या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात घडलेल्या एका गंभीर घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला सुरक्षारक्षकांकडून ढकलाढकली करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मंदिर परिसरातच झालेल्या या हाणामारीमुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या काही भाविकांनीच हे व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गर्दी वाढल्यामुळे मोठ्या दर्शन रांगा लागल्या असून, व्यवस्थापनावर मोठा ताण असल्याचे चित्र आहे. मात्र, गर्दी नियंत्रणाच्या नावाखाली भाविकांशी उद्धट वागणूक देणे किंवा शारीरिक मारहाण करणे अजिबात स्वीकारार्ह नसल्याची भावना भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. “देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांनाच जर मंदिरात अपमानास्पद वागणूक मिळत असेल, तर विश्वास कसा टिकेल?” असा सवालही उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मंदिरातील सुरक्षारक्षकांकडून भाविकांशी गैरवर्तनाच्या तक्रारी यापूर्वीही वेळोवेळी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित सुरक्षारक्षकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी ठाम मागणी भाविकांकडून केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर मंदिर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, दोषींवर कारवाई होणार का आणि पुढील काळात गर्दी व्यवस्थापनासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार, याकडे भाविकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

