(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जयगड परिसरात समुद्रात भराव करण्यासाठी निवळी–जयगड मार्गावरून दिवस-रात्र बेकायदेशीर ओव्हरलोड दगड वाहतूक सुरू आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतुकीमुळे आजवर अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. अपघातांची वाढती मालिका आणि सातत्याने होणाऱ्या जीवितहानीनंतरही प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिक व विविध संघटनांनी वारंवार आंदोलने, निवेदने आणि तक्रारी केल्या. मात्र, प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाकडून दाद मिळत नसल्याने ‘प्रशासन अजून किती बळी घेणार?’ असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा, अपघातांचा धोका आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर निर्माण झालेला प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी प्रतीकात्मक आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करत, ‘अजून बळी घेण्यासाठी शुभेच्छा’ असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाच्या संवेदनशून्य भूमिकेवर कठोर प्रहार करण्यात आला. हे आंदोलन प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधणारे असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेकायदेशीर वाहतुकीवर तातडीने आळा घालावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या विषयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत प्रथमेश गावणकर म्हणाले की, जयगड येथे समुद्रात भराव टाकण्यासाठी निवळी–जयगड मार्गावरून काळ्या दगडाची दिवस-रात्र बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे आजवर अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. वारंवार तक्रारी करूनही पोलीस, आरटीओ आणि प्रशासनाने डोळेझाक केल्याने नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले. अनेक वाहनांचे विमा व पीयूसी कालबाह्य असतानाही कारवाई होत नाही, ही गंभीर बाब आहे. सर्वसामान्यांवर दंडाचा बडगा आणि जीवघेण्या वाहतुकीवर मूकसंमती हे प्रशासनाचे दुटप्पी धोरण असून, राजकीय हितसंबंधांमुळेच कारवाई टाळली जात असल्याचा संशय नागरिकांना आहे. प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणाला कंटाळून या सर्व गाड्या बाजारपेठेमध्ये थांबून त्यांच्या ड्रायव्हरला गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले व अशाच पद्धतीने सर्वसामान्य लोकांचा जीव घेण्यासाठी या व्यवसाय करणाऱ्या ठेकेदार व प्रशासनाला शुभेच्छा दिल्या, किमान लाजेखातर तरी प्रशासनाला जाग येईल व या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले जाईल इतकीच माफक अपेक्षा गावणकर यांनी व्यक्त केली आहे.

