(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहराजवळील मिऱ्याबंदर भागात आंब्याच्या बागेतून चोरट्यांनी काटेरी कुंपण तोडून तब्बल १० हजार रुपयांचे हापुस आंबे चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (ता. २५) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना समोर आली. शुभांगी सावत यांच्या मालकीच्या आंबाबागेची देखरेख कराराने करणारे सुर्यकांत गजानन सावंत (६१, रा. चौसोपीवाडी, सडामिऱ्या, रत्नागिरी) यांनी बागेची पाहणी केली असता, कुंपण फोडलेले दिसून आले आणि बागेतून मोठ्या प्रमाणावर आंबे चोरीला गेलेले आढळले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी बागेतील हापुस जातीचे आंबे तोडून नेले असून, चोरी गेलेल्या आंब्यांची एकूण किंमत सुमारे १० हजार रुपये इतकी आहे. सुर्यकांत सावंत यांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.