(मुंबई)
मध्य रेल्वेवर (Central Railway) आणखी एक महत्त्वाची मार्गिका आकार घेत आहे. पनवेल–कर्जत दरम्यानची नवी रेल्वेमार्गिका आता अंतिम टप्प्यात असून सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर सीआरएमसीची चाचणी, त्यानंतर मध्य रेल्वेकडून नवीन वेळापत्रक तयार केले जाईल. त्यामुळे नव्या वर्षात ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
29.6 किमी लांबीची आणि 2,782 कोटी रुपयांच्या खर्चाची ही मार्गिका पनवेलपासून कर्जतपर्यंत बांधली जात आहे. या कॉरिडोरमुळे प्रवाशांचा सुमारे 25 ते 30 मिनिटांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. पनवेल, चिखले, मोहोपे, चौक आणि कर्जत स्थानकांवरील पायाभूत सुविधा जवळपास पूर्ण झाल्या आहेत. तसेच तीन बोगद्यांचे काम पूर्ण झाले असून फ्लायओव्हरसाठी गर्डर लाँच करण्यात आले आहेत. मोहोपे स्थानकावरील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे कामही यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पनवेल–कर्जतदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुकर होणार आहे. मुंबई आणि उपनगरातील वाढत्या गर्दीचा ताण लक्षात घेऊन हा कॉरिडोर विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे नवी मुंबई, रायगड आणि आजूबाजूच्या भागांना अतिरिक्त रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
दरम्यान, ट्रॅक आणि ओएचईचे काम गतीने करण्यासाठी एमआरव्हीसीने बेलापूर–पनवेलदरम्यान शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक घेऊन बॅलास्टिंग आणि टॅम्पिंगची कामे केली आहेत.
या मार्गिकेवर पनवेल, मोहोपे, चिखले, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके असतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जतहून थेट सीएसएमटीला पनवेलमार्गे जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कर्जतच्या प्रवाशांना पनवेलवरून हार्बर मार्गाने सीएसएमटी गाठता येणार आहे, त्यामुळे सुमारे 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

