( मुंबई )
मुंबईतील अँटॉप हिल परिसरातून सोमवारी (14 जुलै) रात्री बेपत्ता झालेल्या चार वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह कुलाबा येथील ससून डॉक समुद्रकिनाऱ्यावर आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शवविच्छेदनात तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून, अँटॉप हिल पोलिसांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तिच्या सावत्र पित्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून, सध्या पोलिस त्याची चौकशी करत आहेत.
गायब झाल्यानंतर १२ तासांत मृतदेह सापडला
तक्रारदार महिला अँटॉप हिल परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करत असून, तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे. अमायरा असे मृत मुलीचे नाव असून ती आई नाझियासोबत अँटॉप हिलच्या राजीव गांधीनगरातील बंगालीपुरा येथे राहण्यास होती. दोन वेळा लग्न मोडल्यानंतर नाझियाने नुकतेच इम्रान ऊर्फ इम्मू या तरुणाशी लग्न केले होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत अमीरा घरी न परतल्याने तिचा शोध सुरू केला. अखेर तिचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने आईने सोमवारी रात्री अँटॉप हिल पोलिसांत तक्रार दिली. तिच्या पाच मुलांपैकी पीडित मुलगी ही चार वर्षांची होती. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुलगी अचानक घराजवळून बेपत्ता झाली. आईने परिसरात शोध घेतल्यानंतरही मुलगी सापडली नाही, त्यामुळे अँटॉप हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
कुलाबा किनाऱ्यावर मृतदेह आढळला
मुलीचा शोध सुरू असतानाच मंगळवारी (15 जुलै) सकाळी कुलाबा येथील ससून डॉक परिसरात एका चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात हा मृतदेह अँटॉप हिल येथून गायब झालेल्या मुलीचाच असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालात मुलीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सावत्र पित्यावर संशय, पोलिसांकडून चौकशी सुरू
मुलीला अखेरचे तिच्या सावत्र पित्याच्या सोबत पाहण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे त्याला तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. अमायरा लवकर झोपत नव्हती. शिवाय सतत मोबाइल मागत होती. त्याच रागातून हत्या केल्याचीही चर्चा आहे.
पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, इम्राननेच अमायराची हत्या करून तिला समुद्रात फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखाही याचा समांतर तपास करत आहे. चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक सखोल तपास अँटॉप हिल पोलीस करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि घटनास्थळाजवळील माहिती गोळा केली जात आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांना काही माहिती असल्यास संपर्क करण्याचे तसेच अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. लवकरच आरोपीला न्यायालायासमोर आणले जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.