(मुंबई)
काही दिवस उसंत घेतल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मागील आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या पावसाचा जोर किंचित कमी झाला असला तरी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाची शक्यता कायम आहे. कारण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले नवीन कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे मान्सून अजून किमान महिनाभर सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात मान्सूनची तीव्रता साधारणपणे कमी होत जाते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून, ऑक्टोबरमध्ये देशभरात 115 टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. यामुळे गेल्या 50 वर्षांचा विक्रम मोडला जाऊ शकतो.
यामागे दोन प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एक म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून येणारे दमट वारे उत्तरेकडे व पश्चिमेकडे सरकताना थंड हवामान आणि चक्रीवादळांना धडक देतात, त्यामुळे मुसळधार पाऊस होतो. दुसरे म्हणजे, जागतिक तापमानवाढीमुळे मान्सून आणि इतर हवामान प्रणाली अनियमितपणे अधिक सक्रिय होत आहेत. त्यामुळे पावसाचे स्वरूपही अधिक असामान्य आणि तीव्र झाले आहे.

